हे भलते अवघड असते...

काल परवा एम.एस.सी.च्या विदयार्थ्यांचा निरोपाचा दिवस होता. प्रोजेक्ट आटोपून मुलं दुसऱ्या दिवशी होस्टेल-डीपार्टमेंट बाहेर पडत होती. काहींच्या पापण्या  पाणावलेल्या होत्या, अर्थात मुलींच्याच बाबतीत असं होतं असं नाही. आपल्याकडे मुलगा लहान असल्यापासूनच आपण त्यांच्यावर संस्कारच तसे करतो ना, ‘असा मुलीसारखा काय रडतोस?’ वगैरे. म्हणून मुलांची आपण कसे स्ट्रॉग वगैरे दाखवण्याचा प्रयत्न, नौटंकी चाललेली नुसती. आतून तसा प्रत्येक जण घाबरलेला असतो, कासावीस असतो. नेमक्या निरोपाच्या क्षणीच आठवणीं प्रचंड गर्दी करतात, प्रत्येक आठवण रूमाल टाकून सीट सांभाळायला बघते. आपलामात्र असाह्य कंडक्टर होतो, त्यांच्याकडे नुसतं पाहण्यावाचून आपल्या हाती काहीच नसतं. बरं एखाद्या आठवणीला 'बाई बारीक हो' म्हटलं तर तिला जास्तच चेव चढतो, ती आणखी पसरून बसते. सृष्टीची नियम पाळावे लागतात, ठरल्या वेळी गाडी काढावीच लागते. संदीप खरेंच्या भाषेत
‘कारे इतका लळा लावूनि नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते’
            या दोन-पाच वर्षांच्या प्रवासात आपण अनेक उतार चढाव एकत्र अनुभवलेले असतात. प्रवासाला सुरवात करताना ‘प्रवास कसा होईल?’ ही हुरहूर पहिल्याच पावसाच्या सरीं पळवून नेतात. हळूहळू मित्र-मैत्रिणी, ग्रुप, ‘खास’ तयार होत जातात, सुरवातीला नको असलेला सहप्रवासी सुध्दा नंतर हवा हवासा वाटायला लागतो. डीपार्टमेंटची, कॅण्टीनची, ढाब्याची, लॉंनची, कट्ट्याची, रायगडाची, होस्टेलच्या एन्डलेस मज्जाची सवय जळलेल्या मनाला होस्टेल सोडवत नाही. 'इथे कसे आपण तासनतास गप्पा मारायचो, एखाद्याची खेचायचो', 'याच रायगडावर तिला-त्याला पहिल्यांदा भेटलो-प्रपोझ केलं'. पुन्हा भेट होणार नाही झालीच तरी ‘अशी’ भेट होणार नाही, हि कल्पना अस्वस्थ करत असते. म्हणूनच हुंदका आवरून ‘गावी ये-घरी ये’, ‘भेटूया’, ‘टच मध्ये रहा’, ‘विसरू नकोस’ वचनें दिली घेतली जातात.            
            हा कॉलेजचा सुरक्षित किनारा सोडताना नवे प्रदेश, नवी क्षितिजे खुणावत असतात. किनारा सोडल्यानंतर सागरात आपल्या होळीचा निभाव लागेल की नाही? अशी अनामिक भीती गाभाऱ्यातल्या नाविकाला जाणवत असते. 'मनातल्या सितेच्या प्राप्तीसाठीचा ‘शिवधनुष्य’ पेलवेल की  नाही?' असल्या शंकाकुशंका. 'झटकन मिळेल ती नोकरी घेऊ. आई थकलीये, बाबा थकलाय. त्यांनी आपल्यासाठी खूप खस्ता खाल्यायेत. आता आपल्याला संधी आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करायची. त्यांना सुख काय आहे ते दाखवायची'. या सर्वांसाठी गरजेची आहे ती नोकरी/धंदा. मग नोकरीच्या शोधात पायपीट सुरू होते. काहींना 'अभ्यासाच्या जाचातून सुटलो एकदाचे!' असं वाटायला लागलेच असतं आणि इंटरव्ह्यूत निरूत्तर करणारे प्रत्येक प्रश्न, बंक केलेले लेक्चर आठवून देतात. आई-बाबा, नातेवाईक, मित्रांच्या अपेक्षांच्या नजरा त्रास द्यायला लागतात.
       म्हणून खरंच हे सारं अवघड असतं.
हे सगळं मान्य केलं तरी या वर छोटे छोटे उपाय करता येण्यासारखे असतात.
            योग्य वेळी हसता आणि रडता आलं पाहिजे. विरहाचं दु:ख ज्याचं त्यालाच वाहून न्यावं लागणारे. त्यामुळे 'एक्स्प्रेस' होणं महत्त्वाचं आहे. ते रडून-हसून-लिहून-गाणं म्हणून-‘फोटोज-व्हिडीओ’ बनवून का असेना, माध्यम कुठलंही असो 'एक्स्प्रेस' होणं, व्यक्त होणं महत्त्वाचं नाही का? हे सर्वच बाबतीत लागु होतं. आपण व्यक्त होणं विसरलो तर आपल्याला गृहीत धरणं सुरू होतं. 'आपल्याला गृहीत धरलं जाणं' ही भावना अस्तित्वावर आघात करते. मी मार्कांमध्ये-सुंदरतेत 'बिलो अॅवरेज' आहे किंवा ऑफिसमध्ये माझं इंग्रजी कच्चं आहे म्हणून मला गृहीत धरलं जातंय, हा न्यूनगंड फार भयानक. इथं प्रत्येकाला स्वतंत्र असं अस्तित्व असतंच ना. तो विधाता एवढ्या मोठ्या सृष्टीची रचना करताना चुकला नाही, मग तुमच्या-मा‍झ्या सारख्याच्या निर्मितीत तो कसा चुकेल? बगीच्यातली हिरवळ असो की मंदिराच्या कळसाला लागलेलं शेवाळ दोघांनाही अस्तित्व आहेच. हे मान्य की तो प्रत्येकाला एक तरी दुखरी नस देतो. प्रत्येकाची दु:खं वेगळी तशी सुख-बल स्थानं ही वेगळीच. एकट्याने रात्री ऊशी ओली केल्याने कुणाला काही मिळायचं नाही, व्यक्त होणं महत्त्वाचं.
            ‘टच मध्ये रहा’ व्यवसायाच्या-संसाराच्या अडचणी प्रत्येकालाच असणारेत, पण पत्र-मेल-वाढदिवस शुभेच्छा, वरचे वर भेटीगाठी व्हायला हव्यात. दोनाचे चार, चाराचे सहा होतांना भेटी शुभेच्छा होत राहाव्यात. नात्यातला ओलावा टिकून राहायला हवा. तरच आयुष्याच्या झाडावर हिरवळ टिकून राहील. हिरवळ नसलेली झाडं साउली देऊ शकत नाही. व्यवसायात-नोकरीत वर जाणं चागलंच. पण झाडांनी नुसतं उंची वाढवुन चालत नाही, त्यांचा घेराही मोठा असला पाहिजे, नाहीतर हलक्या फुलक्या वादळात ती उन्मळून पडतील. थोडक्यात काय, मित्रांचा गोतावळा हाकेच्या अंतरावर असणं महत्त्वाचं. अंतर गुगल मॅपवरचं नाही, मनातलं अपेक्षित आहे. पाठीवर अपेक्षांचं ओझं भरपूर असलं तरी उराशी बाळगलेली स्वप्नं आपल्याला लढायची उर्मी देत राहतील, गरज असेल ती प्रबळ इच्छा शक्तीची आणि योग्य आधाराची. एकत्रपणे लढायचं ठरवलं तर काहीही अवघड नसेल. 'तु फक्त हो म्हण, सही करायला आम्ही आहोतच' असं काहीतरी. परीक्षेचा अभ्यास एकत्रपणे करतो, तसाच आयुष्याच्या ह्या परीक्षेत सुख दुखांना सोबत करता आली पाहिजे. ‘इंटरव्ह्यूत तुला त्याचं उत्तर आलं नाही म्हणून काय दु:खी होतो, मलातर ह्याचं पण उत्तर देता आलं नाही’, असं म्हणून दु:ख विनोदात बदलवणारा एखादा सखा सोबत असावा. मला नोकरी मिळालीये तरी सोबत इंटरव्ह्यूला येतो, अगोदर जाऊन काय काय विचारतायेत ते तुला मी सांगतो, मग तु जा. एवढं जमलं पाहिजे. याच्या जागा आल्यायेत भाड्या फॉर्म भर, असं हक्काने सांगणारं कुणी तरी असावं.
वपु म्हणतात ‘एक माणूस दुसऱ्या माणसाच्या दु:खाच्या पातळी पर्यंत पोहचुच शकत नाही, तो फक्त कल्पनाच करू शकतो’. मला हे बोलायला सहज शक्य आहे कारण मी किनाऱ्यावर उभा आहे. पण कधीतरी ही पातळी आम्ही सुध्दा जवळून पाहिलीये. आज प्राध्यापक म्हणून काम करतांना दरवर्षीची पावसाळ्यातली हिरवळ मी अनुभवतोय तसंच मे नंतरचा कडक उन्हाळाही.
       असो. बहु काय लिहावे. आपण जाणकार आहातच.

८ टिप्पण्या:

  1. मनोज, छान लिहितोयेस. असाच लिहित राहा.

    उत्तर द्याहटवा