मृगजळ

आज अचानक ‘ती’ समोर आली, फेसबुकच्या पोस्टने. पोस्ट लाईक केली आणि  लागलीच त्याचा फोन आला. शिव्या देत म्हणाला, ‘साल्या, तिच्या फोटोला लाईक करायला बरा वेळ मिळाला. आमच्या साठी तर वेळच नसतो तुला. गावी कधी येतोय? आल्यावर घरी नक्की ये.’ जुन्या आठवणी ताज्या झाल्या, जादूगाराने छोट्याशा टोपीतून रूमाल काढावेत तशा एका पाठोपाठ एक, मस्त रंगीबेरंगी. हत्तीच्या पावलांसारख्या नाही आल्यात त्या ह्या वेळी, आल्यात मुंग्यासारख्या. चोरून एक दोन साखरेचे दाणे खायला. मी प्रवेश नाकारून, त्या ‘येणं’ थांबणार होत्या थोड्याच.
गावी गेलो तेव्हा भेटायला म्हणून मी त्याचं घरच गाठलं. आम्हाला निवांत बोलता यावं म्हणून वहिनीने गच्चीवरच्या खुर्च्यांवर आमची पाठवणी केली. तो बस वगैरे म्हणायच्या फंदात न पडताच सुरू झाला. ‘अरे यार, एवढ्या वर्षात ती फार बदलली असेल, असं वाटलं होतं बघ, पण... ती अगदी तशीच आहे ना अजूनही, नखशिखांत सुंदरच. नजरेतल्या त्या अथांग सागरात आजही मला बुडवू शकेल इतकी. तो फोटो पाहीला ना, तेव्हा अगदी मोजक्या क्षणात मी एम.जे. होस्टेल, चर्च, काव्यरत्नावली, सागर पार्क ते रायगड फेरफटका मारून आलो. आजही उजळणी करायची म्हटली तर ‘दिल चाहता है’ मधल्या सोनालीच्या प्रियकरासारख्या तारखा वेळेसकट सांगू शकतो. थोड्या इकडे तिकडे झाल्या तरी साक्षीदार कोण असणारे? माझ्याशिवाय कुणाच्या लक्षात असणारे.’
तो कुणाबद्दल बोलतोय हे त्याला मला सांगायची गरज नव्हतीच. चहाचे घोट घेत आपल्या अधुऱ्या प्रेम कहाणीबाबत तो बोलत होता, बायको घरात असताना. मी मनातल्या मनात त्याला ‘परम वीर चक्र’ प्रदान केलं.
‘तुला माहीत आहे? इंग्रजीत मिराज म्हणजे काय ते?’ मी नकारार्थी  मान डोलवली.
‘हा इंग्रजी शब्द केवळ तिच्यामुळे माझा आवडता शब्द झालेला. इंग्रजी डिक्शनरी दिसली की हा शब्द शोधणं, ही माझी नित्याची सवय झालेली. अर्थ वाचायचो, तिचा चेहरा समोर यायचा. ‘उर फुटेस्तोवर धावणारा हरीण’ स्वत:त पाहायचो. रात्री डोक्याखाली असलेली उशी डोळ्याखाली घेत अश्रुना वाट मोकळी करायचो. इंग्रजीच का? मराठी-संस्कृत डिक्शनरी सापडली की तिच्या नावाचा अर्थ शोधणं, हा सुध्दा माझा छंद झाला होता. ‘स्री’, ‘हळद’ आणि ‘रात्र’. ‘बघ, तो शेक्सपिअर वेडा होता ना?’ म्हणायचा ‘नावात काय आहे?’ खरंच नावात काहीच नाही? ‘दूर वरून कुणी हळू आवाजातही नाव घेतलं’ किंवा ‘अरे ती बघ लाल स्कुटी’ असं कुणी म्हणायची देर, झालाच मानेचा ‘टेबल फॅन’. असं का?’
मला वाटत होतं, तो माझ्यापेक्षा स्वत:शीच बोलतोय. तरीही मी ऐकणंच पसंत केलं.
‘खरंतर एकतर्फी प्रेमात खूप स्वातंत्र्य असतं. तिच्या जवळ जाण्यापेक्षा मी लांब जाणंच जास्त पसंत करायचो. कोल्ह्याला द्राक्ष असतील कदाचित, पण मनातल्या मनात तयार केलेली तिची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून, अगदी तिच्या स्पर्शानेही. तुला आठवत असेल मी नेहमी म्हणायचो, ‘माझ्या चष्म्याच्या फ्रेम मधली ‘ती’, प्रत्यक्षात कुणी भलतीच निघाली तर. म्हणजे बघा, अशी तशी ती माझ्यासाठी मृगजळच आहे ना? मग हे मृगजळ ‘गोड पाण्याचं आहे’ असं मला माझ्या पुरतं मानू देत. उद्या ते ‘खाऱ्या पाण्याचं आहे’, असं मला समजल्यावर माझं प्रेम/वेड कमी झालं तर?’ आज मूर्खपणा वाटतोय पण तेव्हा...’
लांब श्वास घेत तो माझ्याकडे कौतुकाने बघत होता.
‘काय झालं, असं का बघतोयेस?’, मी समजूनही हसत विचारलं.
‘साल्या, ह्यातली कुठली गोष्ट, कुठली भावना, कुठला क्षण याचा तू साक्षीदार नाहीस. आठवतंय? मी एखाद्या दारुड्या सारखी एकच गोष्ट किती वेळेला तुला ऐकवत राहायचो.’
तो सांगत होता त्यात तथ्य होतं. तेव्हाही मी असंच ऐकत राहायचो. त्याला बरं वाटावं म्हणून.
‘पण भाई, सुरवातीला जे ‘नखशिखांत सुंदर’ म्हटलो ना, ते खोटं होतं रे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. खरं तर ती ‘तेवढी’ सुंदर वगैरे दिसत नव्हती, त्या फोटोत. मी माझ्या मनाशी तेव्हाही असेच खेळ खेळायचो का? ती अशीच होती का? तिचे विचार समजण्या इतकं बोललोच नाही ना कधी, मग तिचे ‘सुंदर’ विचार वगैरे माझ्याच मनाचे खेळ होते का? मी तिच्या (आता) सुमार वाटणाऱ्या कवितेची कमी पारायणं केलीत का? ते मंदिराजवळ दर्शनासाठी पायी फिरणं? माहीत नाही काय प्रकार होता तो.’
एवढ्या वर्षानंतर हा त्याचा बदललेला सूर माझ्यासाठी अगदीच नवीन होता. गच्चीत खुर्च्या टाकून आम्ही बसलेलो. तो न थांबता बोलत होता.
‘आता माझ्या चष्म्याच्या फ्रेमने नवीन आकार घेतलाय. हो, नवीन आकारच तो. माझी सुंदरतेची व्याख्या बदलायला लावणारी ‘कुणी’ माझ्या आयुष्यात पाच-सहा वर्षापूर्वीच आली आहे आणि आता ती ‘कुणीही’ नाही, तर माझं ‘सर्वस्व’ झाली आहे. मी तिच्याबद्दल लिहित असतोच, लिहित राहील. मी माझी बरीच पापं हीच्यापासून लपवली आहेत. पण हे नाही, पाप वगैरे वाटलं नाही म्हणून असेल कदाचित. ‘फर्स्ट साईट लव’ वर माझा तेव्हाही विश्वास नव्हता, तुला माहीत आहे तसा आजही नाही आहे. क्षणाक्षणांनी ते आकाराला यावं, वृद्धिंगत व्हावं एवढी माझी अपेक्षा. आता परवा परवाची गोष्ट आहे. ‘ती सध्या काय करते?’ आम्ही जोडीने बघीतला. जुन्या आठवणी आणि बायकोच्या कोपरखळ्या यांची नुसती जुगलबंदी चाललेली. बाहेर पडताना बायको म्हटली, ‘मग ठेवायचं का आपल्यापण मुलीचं नाव...’. शपथ सांगतो, फ्रेम ‘कोलीन’ने साफ केली. आपल्याला आपली बायको कालपेक्षा आज दुप्पट आवडते. ‘नाव ठेवायचं बोलली’ म्हणून नाही, तिने इतक्या खिलाडु वृत्तीने हे सर्व अॅक्सेप्ट केलं म्हणून.’
‘ती सुंदर आहे, सांगायची गरज नाही. बघायला गेलो, तेव्हा वाजलेल्या गिटारपासून ते पहील्या रात्रीपर्यंत सगळं तर तूला माहितीये. पण तिच्या ‘ह्या’ आणि अशा  सौंदर्यासाठी मला बोलावसं वाटतं. आता तिच्या बाबतीत एकतर्फी प्रेमाची भानगड नाही. जे आहे माझं हक्काचं आहे, बायकोही आणि तिचं प्रेमही. तिच्यासमोर ‘इमेज’ खराब वगैरे होण्याचा फंडाच नाही, मनसोक्त भांडतो, पोटभर प्रेम करतो. एक दुसर्यासाठी थोडं बदलतो, एक दुसर्याला बदलवतो अन रोज नव्याने प्रेमात पडतो.’
एव्हाना स्वत:च कौतुक ऐकून वहिनी आलीच.
‘तुमचा मित्र ठार वेडा आहे. हा असाच बडबड करत राहतो. तुम्ही लावून दिलेल्या घाणेरड्या सवयीमुळे, मला असं ऐकून घ्यावं लागत.’ एक चिमटा काढला आणि गालातल्या गालात हसत निघून गेली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा