पेपीलोन

‘लग्नाचं, काय गिफ्ट दिलंत?’ कोल्डड्रिंक पीत पीत त्याने विचारलं.
‘पाकिटांचा बॉक्स’, मी शांतपणे उत्तरलो. त्याला समजलं नाही.
‘बॉक्स! कोणता?’
‘मेडिकलवर गेल्यावर मागायला लाज वाटते, तो.’
तो दिलखुलास हसला. ‘साले, तुम्ही लोकं सुधारणार नाहीत.’

‘अरे, कुटुंब नियोजनासाठी नाही. सुरुवातीचा काळ समजण्या-उमजण्यात जावा. रिकामे उपवास घडू नये एवढी प्रामाणिक इच्छा, बाकी लोकसंख्या वगैरे विषय गौण. त्याचं तो व्यवस्थित बघेल, तू सांग. कसं चाललंय? काय म्हणते तुझी बायको? दिड वर्ष होत आलंय, मुल बाळ नाही. बस कर आता.’

‘माझं सर्व चांगलं चाललंय. मस्तच एकदम.’
कोल्डड्रिंकच्या बॉटलशी खेळत तो बोलला. पालटलेला नुर, नजरेवरून मी समजायचं ते समजलो. लग्नानंतर आजच भेटत होतो मी त्याला, तब्बल दिड वर्षांनी. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, याचा मला अंदाज आला. मी बॉटलला टिचकी मारत हक्काने ‘बोल!’ म्हटलो. तो वाटच बघत होता.

‘बघ मन्या, ह्या रेस्टारंटच नाव ‘पेपीलोन’, फ्रेंच असेल शब्द कदाचित. ‘बागळणारी फुलपाखरं’ हा त्याचा अर्थ. ह्या नावाची एके काळची बेस्ट सेलर आत्मकथा का, काय आहे, कुणा हेनरी नावाच्या माणसाची. कैदेतून तो स्वतःची सुटका करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहतो. तो यशस्वी होतो, पार म्हातारपणी. पुस्तक वाचायची तुझी बोंब पडणार नाहीच आहे, तू भाड्या मूव्हीच बघ.’

एम.जे. कॉलेजातली पाच वर्ष ह्या हॉटेली समोरून ये-जा करायचो, आतल्या कपल्सकडे बघायचं सोडून, मरायला अर्थ बिर्थ पाहणार होतो. तसा ह्या नमुन्याला अर्थाशी काय देणं घेणं, मी विचारतोय काय? हा बोलतोय काय? मूव्ही काय? ह्याचा एखादा स्क्रु? अशा शंकांनी माझ्या मनात गर्दी केली.

‘असा बघू नको, मुद्यावर येतोय. लहानपणी बघ, तो ‘हेलिकॉप्टर’ किडा असायचा, त्याला आपण पकडायचो, त्याच्या शेपटाला का काय दोरा वगैरे बांधायचो. तो उडायचा प्रयत्न करायचा अन् आपण पतंग उडवतात त्या स्टाईलने त्याचा असुरी आस्वाद घ्यायचो.’  

‘पुन्हा ह्याची चंद्री चगली’ मी आपलं स्वतःशीच.

‘आमच्या आयुष्याच तसं झालंय. फुलपाखरू, स्वातंत्र्य वगैरे खिडकी बाहेर. नो डाउट, वी लव इच अदर बट... साला तो स्पार्क हरवत चाललाय राव. आम्ही एकाच घरात सोबत राहतो, खातो, पितो, झोपतो. बेडपासून ते बँक अकौंटपर्यंत अगदी सगळ शेअर करतो. विचार? त्याचं काय?’

‘तुमचं काही भांडण वगैरे?’ माझा आपला बाळबोध प्रश्न त्याला रूळावर आणण्यासाठी.

‘अरे नाही रे बाबा. आमचे थोडे विचार वेगळे आहेत एवढंच. बघ, अगदी टोकाचे विचार करणाऱ्या लोकांचे पण संसार आनंदात होतात. माझ्यासाठी ते कोडं आहे. आमचे विचार वेगळे आहेत त्याची मला अडचण नाहीये, अडचण वेगळीच आहे.’

मी तसाच क्ल्यूलेस.

‘मार्केटिंगची एक पद्धत असते बघ, ते फालतू गोष्टीची इतकी पब्लिसिटी करतात. हळूहळू पण हजारदा होणार्या ह्या हमरिंगमुळे आपल्याला ती गोष्ट खरी/चांगली वाटायला लागते. आपले सध्याचे राजकारणी वापरतात ही पद्धत जास्त.’

मला ‘पतंजली’ आणि ‘फेकू’ प्रोडक्टस् आठवलीत.

‘उदाहरण देतो. माझं लहानपण मावशीकडे गेलं. मावशीने रडत कढत का होईना, माझं सर्व शिक्षण केलं. आज जे काही चांगले दिवस मला, माझ्या मायबापाला दिसता आहेत, ते तिच्यामुळेच. माझ्या आईवडीलांच आणि तीचं वैर जुनं आहे, तिची पोरं नाकर्ती निघालीत म्हणून कदाचित. मी सणासुदीला त्यांच्याकडे जात असतो, घरच्यांचा विरोध असतानाही. माझं माझ्या मावसभावंडांशी असलेलं सख्य घरच्यांना रुचत नाही आणि तरीही मी त्यांना जुमानीत नसतो. आता परिस्थिती बदलली आहे, माझं लग्न झालंय. लग्नाच्या पहिल्या रात्रीच बायकोला ही सर्व कल्पना दिलेली. तिनेही तेव्हा ‘तुम्ही बरोबर वागतायेत’, ‘माणसाने असं कृतघ्न असू नये’ सारखी वाक्ये वापरलीत. मी आनंदलो. सुरुवातीला सगळं आलबेल होतं. हळू हळू तिची मनस्थिती बदलत गेली. घरी आईचा पाठिंबा तिला मिळाला अन् ती आता त्यांच्या घरी पायही ठेवायला तयार नसते. म्हणजे ते ‘कृतघ्न’ वगैरे सगळं तेल लावत गेलं. तिच्या समर्थनार्थ ती ‘त्यांची मुलं तुमच्यापेक्षा लहान आहेत, कधी येतात का तुम्हाला भेटायला? मग आपणच का जायचं?’ असली वाक्ये वापरते. मी शिखराकडे पाहायला सांगतो ती दगड धोंड्यांत अडकून पडते’

‘कॉलेज पासून माझा मित्रांचा गोतावळा तुला माहीत आहे. आपण एखाद्याला जीव लावतो म्हणजे एकदम...
‘बघा, तुमचे मित्र असेच आहेत, त्यांनी असंच केलं, तसंच केलं’. सास बहु सिरियल्स न बघताही ह्या सर्व कथा ती मनातल्या मनात रचत असते. बरं, हिला स्वतःचा मित्र परिवार नाही. ती कुणाकडे जात नाही. कुणी हिला भेटायलाही येत नाही. मी तिला डांबून ठेवत असेल असं तुला वाटेल कदाचित, पण तसही नाही. ती एका चांगल्या संस्थेत नोकरी करते. बरं मग तिथल्या मैत्रिणींना तरी घरी बोलवावं, त्यांच्या घरी जावं तसही नाही. मित्रांच्या बायकांशी तिची ओळख करून दिली. हेतू हाच की, कमीत कमी त्यांच्याशी तरी तिची मैत्री वगैरे. कुणीही कीतीही पटवून सांगा पण पालथ्या घड्यावर पाणी. अख्खं जग कसं वाईट आहे, ‘त्या हिच्याशी कशा वागतात’, असले तिचे विचार. म्हणजे तुला सांगतो, ही ‘सख्ख्या आईला, भावाला’ चांगलं म्हणत नाही राव. मी आणि माझा नवरा बास्स.’

‘हे सर्व तिने स्वतःपर्यंत ठेवलं असतं तर आपली काही फार हरकत नव्हती. पण तिने आता मलाही बदलवून टाकलंय, त्या मार्केटिंगसारखं. मित्रांना भेटणंही बंद होत चाललंय. तिच्या असल्या स्वभावामुळे मित्रही अगोदर सारखे संपर्कात नाहीत. आता भेटतो आहे, ती माहेरी गेलीये म्हणून, आपल्या ‘पेपीलोन’ ह्या सारखं उंडारत फिरतोय इकड तिकड. स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय, काही काळ. मग नंतर आहेच आपलं येरे माझ्या मागल्या. असंच चालू राहिलं तर मी तिरडीवर झोपलेला असेल आणि माझा पोरगा घातक मधल्या सनी देओल सारखा एकटाच त्याच्या बापाचा देह स्मशानात पोहोचवेल.’

त्या हेनरीला म्हातारपणापर्यंत वाट पहावी लागली सुटकेसाठी, माझ्या ह्या हेनरीच काय करू? ह्याच्या हेलिकॉप्टर’ किड्याचा दोरा कुणाच्या हातात आहे मला कसं सांगता येणार? उपाय काय सुचवू, मी पुन्हा तसाच क्ल्यूलेस होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा