कृष्णा

तू तुझं सुदर्शन चालवलं शिशुपालाचा शंभरावा म्हणून की
गंगेसारख्या स्त्रीबद्दलचे अपशव्द तुला सहन झाले नाहीत म्हणून
कारण काहीही असो, माझ्या मनात तुझ्याबद्दलचं प्रेम कितीतरी पटीत वाढलं 
तुझ्या सारखंच तिचंही नाव कृष्णा ना रे, मैत्रिण ना तुझी
भर सभेत तिच्या अब्रुवर दुशासनाने हात घातला
तेव्हा मग तुझा सुदर्शन शांत का होता

तू लबाड आहेस, तुझ्या प्रत्येक कृतीचं समर्पक उत्तर देशील
तुझ्यावरच्या प्रेमा पोटी ते मी डोळे झाकून मान्यही करेल
पण आज खटकतंय तुझं असं सखा, मित्र असणं
गांधारीला तू वचन दिल्याचं स्मरणात नाही आणि असलंच तरी
त्यांचा तो एक अपराध तुला शंभर अपराधांसम वाटला नव्हता?
तिच्या हाकेला, रक्षणाला तू धावून आलास, नक्कीच...
तुझ्यावर प्रेम करायला मला आणखी एक कारण मिळालं
तिच्या देहावर वस्र राहावीत म्हणून तू धडपडलास
पण त्यांचे हात कापायला तू सुदर्शन का नाही वापरलं?
मला राग आलाय तुझा...

खरंतर तुझ्यावर रागवून काय उपयोग म्हणा,
आजची स्थिती पाहता, माझे बाप त्याच सभेत कुठे तरी असतील
स्त्रीच्या अब्रुचे सौदे करणारे,
वस्त्रहरण करण्यात मर्दानगी समजणारे,
भीष्मासम मान खाली घालून किंवा विधुरासम सभात्याग केलेले,
कर्णासम दया याचना केली नाही म्हणून तमाशा बघणारे,
धृतराष्ट्रासम सत्ता असून अंध,
नाही तर निर्लज्जपणे जागच्या जागी बसलेले नंतरच्या कॅण्डल मार्चची प्लानिंग करणारे...

लव यु कृष्णा, तू तिला कापड दिलीस अन बाकीची मंडळी नागडी केलीत

पेपीलोन

‘लग्नाचं, काय गिफ्ट दिलंत?’ कोल्डड्रिंक पीत पीत त्याने विचारलं.
‘पाकिटांचा बॉक्स’, मी शांतपणे उत्तरलो. त्याला समजलं नाही.
‘बॉक्स! कोणता?’
‘मेडिकलवर गेल्यावर मागायला लाज वाटते, तो.’
तो दिलखुलास हसला. ‘साले, तुम्ही लोकं सुधारणार नाहीत.’

‘अरे, कुटुंब नियोजनासाठी नाही. सुरुवातीचा काळ समजण्या-उमजण्यात जावा. रिकामे उपवास घडू नये एवढी प्रामाणिक इच्छा, बाकी लोकसंख्या वगैरे विषय गौण. त्याचं तो व्यवस्थित बघेल, तू सांग. कसं चाललंय? काय म्हणते तुझी बायको? दिड वर्ष होत आलंय, मुल बाळ नाही. बस कर आता.’

‘माझं सर्व चांगलं चाललंय. मस्तच एकदम.’
कोल्डड्रिंकच्या बॉटलशी खेळत तो बोलला. पालटलेला नुर, नजरेवरून मी समजायचं ते समजलो. लग्नानंतर आजच भेटत होतो मी त्याला, तब्बल दिड वर्षांनी. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, याचा मला अंदाज आला. मी बॉटलला टिचकी मारत हक्काने ‘बोल!’ म्हटलो. तो वाटच बघत होता.

‘बघ मन्या, ह्या रेस्टारंटच नाव ‘पेपीलोन’, फ्रेंच असेल शब्द कदाचित. ‘बागळणारी फुलपाखरं’ हा त्याचा अर्थ. ह्या नावाची एके काळची बेस्ट सेलर आत्मकथा का, काय आहे, कुणा हेनरी नावाच्या माणसाची. कैदेतून तो स्वतःची सुटका करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहतो. तो यशस्वी होतो, पार म्हातारपणी. पुस्तक वाचायची तुझी बोंब पडणार नाहीच आहे, तू भाड्या मूव्हीच बघ.’

एम.जे. कॉलेजातली पाच वर्ष ह्या हॉटेली समोरून ये-जा करायचो, आतल्या कपल्सकडे बघायचं सोडून, मरायला अर्थ बिर्थ पाहणार होतो. तसा ह्या नमुन्याला अर्थाशी काय देणं घेणं, मी विचारतोय काय? हा बोलतोय काय? मूव्ही काय? ह्याचा एखादा स्क्रु? अशा शंकांनी माझ्या मनात गर्दी केली.

‘असा बघू नको, मुद्यावर येतोय. लहानपणी बघ, तो ‘हेलिकॉप्टर’ किडा असायचा, त्याला आपण पकडायचो, त्याच्या शेपटाला का काय दोरा वगैरे बांधायचो. तो उडायचा प्रयत्न करायचा अन् आपण पतंग उडवतात त्या स्टाईलने त्याचा असुरी आस्वाद घ्यायचो.’  

‘पुन्हा ह्याची चंद्री चगली’ मी आपलं स्वतःशीच.

‘आमच्या आयुष्याच तसं झालंय. फुलपाखरू, स्वातंत्र्य वगैरे खिडकी बाहेर. नो डाउट, वी लव इच अदर बट... साला तो स्पार्क हरवत चाललाय राव. आम्ही एकाच घरात सोबत राहतो, खातो, पितो, झोपतो. बेडपासून ते बँक अकौंटपर्यंत अगदी सगळ शेअर करतो. विचार? त्याचं काय?’

‘तुमचं काही भांडण वगैरे?’ माझा आपला बाळबोध प्रश्न त्याला रूळावर आणण्यासाठी.

‘अरे नाही रे बाबा. आमचे थोडे विचार वेगळे आहेत एवढंच. बघ, अगदी टोकाचे विचार करणाऱ्या लोकांचे पण संसार आनंदात होतात. माझ्यासाठी ते कोडं आहे. आमचे विचार वेगळे आहेत त्याची मला अडचण नाहीये, अडचण वेगळीच आहे.’

मी तसाच क्ल्यूलेस.

‘मार्केटिंगची एक पद्धत असते बघ, ते फालतू गोष्टीची इतकी पब्लिसिटी करतात. हळूहळू पण हजारदा होणार्या ह्या हमरिंगमुळे आपल्याला ती गोष्ट खरी/चांगली वाटायला लागते. आपले सध्याचे राजकारणी वापरतात ही पद्धत जास्त.’

मला ‘पतंजली’ आणि ‘फेकू’ प्रोडक्टस् आठवलीत.

‘उदाहरण देतो. माझं लहानपण मावशीकडे गेलं. मावशीने रडत कढत का होईना, माझं सर्व शिक्षण केलं. आज जे काही चांगले दिवस मला, माझ्या मायबापाला दिसता आहेत, ते तिच्यामुळेच. माझ्या आईवडीलांच आणि तीचं वैर जुनं आहे, तिची पोरं नाकर्ती निघालीत म्हणून कदाचित. मी सणासुदीला त्यांच्याकडे जात असतो, घरच्यांचा विरोध असतानाही. माझं माझ्या मावसभावंडांशी असलेलं सख्य घरच्यांना रुचत नाही आणि तरीही मी त्यांना जुमानीत नसतो. आता परिस्थिती बदलली आहे, माझं लग्न झालंय. लग्नाच्या पहिल्या रात्रीच बायकोला ही सर्व कल्पना दिलेली. तिनेही तेव्हा ‘तुम्ही बरोबर वागतायेत’, ‘माणसाने असं कृतघ्न असू नये’ सारखी वाक्ये वापरलीत. मी आनंदलो. सुरुवातीला सगळं आलबेल होतं. हळू हळू तिची मनस्थिती बदलत गेली. घरी आईचा पाठिंबा तिला मिळाला अन् ती आता त्यांच्या घरी पायही ठेवायला तयार नसते. म्हणजे ते ‘कृतघ्न’ वगैरे सगळं तेल लावत गेलं. तिच्या समर्थनार्थ ती ‘त्यांची मुलं तुमच्यापेक्षा लहान आहेत, कधी येतात का तुम्हाला भेटायला? मग आपणच का जायचं?’ असली वाक्ये वापरते. मी शिखराकडे पाहायला सांगतो ती दगड धोंड्यांत अडकून पडते’

‘कॉलेज पासून माझा मित्रांचा गोतावळा तुला माहीत आहे. आपण एखाद्याला जीव लावतो म्हणजे एकदम...
‘बघा, तुमचे मित्र असेच आहेत, त्यांनी असंच केलं, तसंच केलं’. सास बहु सिरियल्स न बघताही ह्या सर्व कथा ती मनातल्या मनात रचत असते. बरं, हिला स्वतःचा मित्र परिवार नाही. ती कुणाकडे जात नाही. कुणी हिला भेटायलाही येत नाही. मी तिला डांबून ठेवत असेल असं तुला वाटेल कदाचित, पण तसही नाही. ती एका चांगल्या संस्थेत नोकरी करते. बरं मग तिथल्या मैत्रिणींना तरी घरी बोलवावं, त्यांच्या घरी जावं तसही नाही. मित्रांच्या बायकांशी तिची ओळख करून दिली. हेतू हाच की, कमीत कमी त्यांच्याशी तरी तिची मैत्री वगैरे. कुणीही कीतीही पटवून सांगा पण पालथ्या घड्यावर पाणी. अख्खं जग कसं वाईट आहे, ‘त्या हिच्याशी कशा वागतात’, असले तिचे विचार. म्हणजे तुला सांगतो, ही ‘सख्ख्या आईला, भावाला’ चांगलं म्हणत नाही राव. मी आणि माझा नवरा बास्स.’

‘हे सर्व तिने स्वतःपर्यंत ठेवलं असतं तर आपली काही फार हरकत नव्हती. पण तिने आता मलाही बदलवून टाकलंय, त्या मार्केटिंगसारखं. मित्रांना भेटणंही बंद होत चाललंय. तिच्या असल्या स्वभावामुळे मित्रही अगोदर सारखे संपर्कात नाहीत. आता भेटतो आहे, ती माहेरी गेलीये म्हणून, आपल्या ‘पेपीलोन’ ह्या सारखं उंडारत फिरतोय इकड तिकड. स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय, काही काळ. मग नंतर आहेच आपलं येरे माझ्या मागल्या. असंच चालू राहिलं तर मी तिरडीवर झोपलेला असेल आणि माझा पोरगा घातक मधल्या सनी देओल सारखा एकटाच त्याच्या बापाचा देह स्मशानात पोहोचवेल.’

त्या हेनरीला म्हातारपणापर्यंत वाट पहावी लागली सुटकेसाठी, माझ्या ह्या हेनरीच काय करू? ह्याच्या हेलिकॉप्टर’ किड्याचा दोरा कुणाच्या हातात आहे मला कसं सांगता येणार? उपाय काय सुचवू, मी पुन्हा तसाच क्ल्यूलेस होतो.

मृगजळ

आज अचानक ‘ती’ समोर आली, फेसबुकच्या पोस्टने. पोस्ट लाईक केली आणि  लागलीच त्याचा फोन आला. शिव्या देत म्हणाला, ‘साल्या, तिच्या फोटोला लाईक करायला बरा वेळ मिळाला. आमच्या साठी तर वेळच नसतो तुला. गावी कधी येतोय? आल्यावर घरी नक्की ये.’ जुन्या आठवणी ताज्या झाल्या, जादूगाराने छोट्याशा टोपीतून रूमाल काढावेत तशा एका पाठोपाठ एक, मस्त रंगीबेरंगी. हत्तीच्या पावलांसारख्या नाही आल्यात त्या ह्या वेळी, आल्यात मुंग्यासारख्या. चोरून एक दोन साखरेचे दाणे खायला. मी प्रवेश नाकारून, त्या ‘येणं’ थांबणार होत्या थोड्याच.
गावी गेलो तेव्हा भेटायला म्हणून मी त्याचं घरच गाठलं. आम्हाला निवांत बोलता यावं म्हणून वहिनीने गच्चीवरच्या खुर्च्यांवर आमची पाठवणी केली. तो बस वगैरे म्हणायच्या फंदात न पडताच सुरू झाला. ‘अरे यार, एवढ्या वर्षात ती फार बदलली असेल, असं वाटलं होतं बघ, पण... ती अगदी तशीच आहे ना अजूनही, नखशिखांत सुंदरच. नजरेतल्या त्या अथांग सागरात आजही मला बुडवू शकेल इतकी. तो फोटो पाहीला ना, तेव्हा अगदी मोजक्या क्षणात मी एम.जे. होस्टेल, चर्च, काव्यरत्नावली, सागर पार्क ते रायगड फेरफटका मारून आलो. आजही उजळणी करायची म्हटली तर ‘दिल चाहता है’ मधल्या सोनालीच्या प्रियकरासारख्या तारखा वेळेसकट सांगू शकतो. थोड्या इकडे तिकडे झाल्या तरी साक्षीदार कोण असणारे? माझ्याशिवाय कुणाच्या लक्षात असणारे.’
तो कुणाबद्दल बोलतोय हे त्याला मला सांगायची गरज नव्हतीच. चहाचे घोट घेत आपल्या अधुऱ्या प्रेम कहाणीबाबत तो बोलत होता, बायको घरात असताना. मी मनातल्या मनात त्याला ‘परम वीर चक्र’ प्रदान केलं.
‘तुला माहीत आहे? इंग्रजीत मिराज म्हणजे काय ते?’ मी नकारार्थी  मान डोलवली.
‘हा इंग्रजी शब्द केवळ तिच्यामुळे माझा आवडता शब्द झालेला. इंग्रजी डिक्शनरी दिसली की हा शब्द शोधणं, ही माझी नित्याची सवय झालेली. अर्थ वाचायचो, तिचा चेहरा समोर यायचा. ‘उर फुटेस्तोवर धावणारा हरीण’ स्वत:त पाहायचो. रात्री डोक्याखाली असलेली उशी डोळ्याखाली घेत अश्रुना वाट मोकळी करायचो. इंग्रजीच का? मराठी-संस्कृत डिक्शनरी सापडली की तिच्या नावाचा अर्थ शोधणं, हा सुध्दा माझा छंद झाला होता. ‘स्री’, ‘हळद’ आणि ‘रात्र’. ‘बघ, तो शेक्सपिअर वेडा होता ना?’ म्हणायचा ‘नावात काय आहे?’ खरंच नावात काहीच नाही? ‘दूर वरून कुणी हळू आवाजातही नाव घेतलं’ किंवा ‘अरे ती बघ लाल स्कुटी’ असं कुणी म्हणायची देर, झालाच मानेचा ‘टेबल फॅन’. असं का?’
मला वाटत होतं, तो माझ्यापेक्षा स्वत:शीच बोलतोय. तरीही मी ऐकणंच पसंत केलं.
‘खरंतर एकतर्फी प्रेमात खूप स्वातंत्र्य असतं. तिच्या जवळ जाण्यापेक्षा मी लांब जाणंच जास्त पसंत करायचो. कोल्ह्याला द्राक्ष असतील कदाचित, पण मनातल्या मनात तयार केलेली तिची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून, अगदी तिच्या स्पर्शानेही. तुला आठवत असेल मी नेहमी म्हणायचो, ‘माझ्या चष्म्याच्या फ्रेम मधली ‘ती’, प्रत्यक्षात कुणी भलतीच निघाली तर. म्हणजे बघा, अशी तशी ती माझ्यासाठी मृगजळच आहे ना? मग हे मृगजळ ‘गोड पाण्याचं आहे’ असं मला माझ्या पुरतं मानू देत. उद्या ते ‘खाऱ्या पाण्याचं आहे’, असं मला समजल्यावर माझं प्रेम/वेड कमी झालं तर?’ आज मूर्खपणा वाटतोय पण तेव्हा...’
लांब श्वास घेत तो माझ्याकडे कौतुकाने बघत होता.
‘काय झालं, असं का बघतोयेस?’, मी समजूनही हसत विचारलं.
‘साल्या, ह्यातली कुठली गोष्ट, कुठली भावना, कुठला क्षण याचा तू साक्षीदार नाहीस. आठवतंय? मी एखाद्या दारुड्या सारखी एकच गोष्ट किती वेळेला तुला ऐकवत राहायचो.’
तो सांगत होता त्यात तथ्य होतं. तेव्हाही मी असंच ऐकत राहायचो. त्याला बरं वाटावं म्हणून.
‘पण भाई, सुरवातीला जे ‘नखशिखांत सुंदर’ म्हटलो ना, ते खोटं होतं रे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. खरं तर ती ‘तेवढी’ सुंदर वगैरे दिसत नव्हती, त्या फोटोत. मी माझ्या मनाशी तेव्हाही असेच खेळ खेळायचो का? ती अशीच होती का? तिचे विचार समजण्या इतकं बोललोच नाही ना कधी, मग तिचे ‘सुंदर’ विचार वगैरे माझ्याच मनाचे खेळ होते का? मी तिच्या (आता) सुमार वाटणाऱ्या कवितेची कमी पारायणं केलीत का? ते मंदिराजवळ दर्शनासाठी पायी फिरणं? माहीत नाही काय प्रकार होता तो.’
एवढ्या वर्षानंतर हा त्याचा बदललेला सूर माझ्यासाठी अगदीच नवीन होता. गच्चीत खुर्च्या टाकून आम्ही बसलेलो. तो न थांबता बोलत होता.
‘आता माझ्या चष्म्याच्या फ्रेमने नवीन आकार घेतलाय. हो, नवीन आकारच तो. माझी सुंदरतेची व्याख्या बदलायला लावणारी ‘कुणी’ माझ्या आयुष्यात पाच-सहा वर्षापूर्वीच आली आहे आणि आता ती ‘कुणीही’ नाही, तर माझं ‘सर्वस्व’ झाली आहे. मी तिच्याबद्दल लिहित असतोच, लिहित राहील. मी माझी बरीच पापं हीच्यापासून लपवली आहेत. पण हे नाही, पाप वगैरे वाटलं नाही म्हणून असेल कदाचित. ‘फर्स्ट साईट लव’ वर माझा तेव्हाही विश्वास नव्हता, तुला माहीत आहे तसा आजही नाही आहे. क्षणाक्षणांनी ते आकाराला यावं, वृद्धिंगत व्हावं एवढी माझी अपेक्षा. आता परवा परवाची गोष्ट आहे. ‘ती सध्या काय करते?’ आम्ही जोडीने बघीतला. जुन्या आठवणी आणि बायकोच्या कोपरखळ्या यांची नुसती जुगलबंदी चाललेली. बाहेर पडताना बायको म्हटली, ‘मग ठेवायचं का आपल्यापण मुलीचं नाव...’. शपथ सांगतो, फ्रेम ‘कोलीन’ने साफ केली. आपल्याला आपली बायको कालपेक्षा आज दुप्पट आवडते. ‘नाव ठेवायचं बोलली’ म्हणून नाही, तिने इतक्या खिलाडु वृत्तीने हे सर्व अॅक्सेप्ट केलं म्हणून.’
‘ती सुंदर आहे, सांगायची गरज नाही. बघायला गेलो, तेव्हा वाजलेल्या गिटारपासून ते पहील्या रात्रीपर्यंत सगळं तर तूला माहितीये. पण तिच्या ‘ह्या’ आणि अशा  सौंदर्यासाठी मला बोलावसं वाटतं. आता तिच्या बाबतीत एकतर्फी प्रेमाची भानगड नाही. जे आहे माझं हक्काचं आहे, बायकोही आणि तिचं प्रेमही. तिच्यासमोर ‘इमेज’ खराब वगैरे होण्याचा फंडाच नाही, मनसोक्त भांडतो, पोटभर प्रेम करतो. एक दुसर्यासाठी थोडं बदलतो, एक दुसर्याला बदलवतो अन रोज नव्याने प्रेमात पडतो.’
एव्हाना स्वत:च कौतुक ऐकून वहिनी आलीच.
‘तुमचा मित्र ठार वेडा आहे. हा असाच बडबड करत राहतो. तुम्ही लावून दिलेल्या घाणेरड्या सवयीमुळे, मला असं ऐकून घ्यावं लागत.’ एक चिमटा काढला आणि गालातल्या गालात हसत निघून गेली.

नसती शंका

तो डेथ बेड वर शेवटच्या घटका मोजत होता. म्हणायला तशी घरची, जवळची म्हणवणारी सर्वच त्याच्या आजुबाजुला होती. ती सर्व त्याला चौफेर घेरून उभी होती. कुणी पाय चेपत होतं, कुणी कपाळावर हात फिरवत होतं. कुणी मनगटाला हात लावुन नाडी बघत होतं. कुणी सलाईनची नळी कमी जास्त करत होतं. काहींनी रडके चेहरे हाताने लपवले होते. तर काहींनी बाहेर चक्क तिरडी बांधायला घेतली. मडकं, बोळवण सगळं आणायची तयारी चाललेली. इतकी घाई का? डॉक्टरांनी अगोदरच हात टेकलेत का? पण डॉक्टर, नर्स कुणीही का दिसत नाहीये इथं. असं का?
ते त्याच्या आजूबाजूला जे आहेत, ते खरच त्याच्या जवळचे की? ते असे त्याला घेरून उभे आहेत ते यमराजाला तो दिसु नये म्हणुन, की त्याला मारतांना कुणी बाहेरच्याने पाहु नये म्हणुन. कपाळावर, पायावर हातावर ठेवलेले हात काळजीने ठेवलेत की तो झटापट करू नये म्हणुन. ती सलाईन बंद तर करत नाहीयेत ना? पण त्याच तोंड तर उघडय ना, तो ओरडु तर शकतोच ना. मग त्याला यम किंवा आणखी कुणी मारत असताना तो ओरडला का नाही? 'मारू नका', 'काका, मला वाचवा' सारख्या गयावया/विनंत्याही नाही. हात पाय झटकनं नाही. रक्ताच्याच नात्यांनी रक्ताचा सडा पाडायचा ठरवल्यावर तो हतबल झाला असेल का? अर्जुनाने हातातली शस्त्र सोडलीत तशी त्यानेही सोडली असतील का? का धर्माचं ज्ञान देणाऱ्या कृष्णाच्या हातूनच मृत्यु येणार म्हणुन हा असा वागला असेल?
ह्या सर्वांत ती कुठं आहे? म्हणे साता जन्माची सोबतीण, मग आता कुठंय ती? का वाल्या कोळ्याच्या अर्धांगिनी सारखी ती ही उत्तरली असेल? देवा ब्राम्हणांसमोर घेतलेल्या आणाभाका ती इतक्या सहजासहजी विसरली असेल? तसं असेल तर हरकत नाही, कारण 'जगाचा व्याप व्यवहारावर चालतो'. पण ही सावित्रीची लेक तिच्या सत्यवानाच्या मारेकऱ्यांना सामील असेल तर? त्याउपर तीच सूत्रधार असेल तर?
माझ्या शंकांची उत्तरं कोण देणार? त्याचे आप्त, कृष्ण, यम की तो स्वतः? गुन्हेगारच कसली कबुली देणार. फक्त तोच सांगु शकतो. हो तोच. पण तो तर निघालाय लांबच्या प्रवासाला जिथं काहीही घेऊन जाता येत नाही, अगदी प्रश्नच काय पण उत्तरंही नाही. मग?

गर्दी

गर्दीला शिव्या घालणं तसं आपल्याला नवीन नसतं, आपण त्या गर्दीचा एक भाग असलो तरी. लागोपाठ सुट्ट्या आल्या की रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निवांतपणा शोधण्यासाठी आपण बाहेर पडतो. नजीकचं प्रेक्षणीय स्थळ जायचं ठरवतो किंवा सुट्टी धार्मिक कारणासाठी असेल तर धार्मिक स्थळ. ठराविक अंतर पार करून अनंत अडचणींवर मात करत किंवा अंताक्षरी खेळत आपण तिथं पोहचतो. निसर्गाचा/भक्तीचा आस्वाद घ्यायचा विचार मनात असतो अन् आपल्यासारखेच विचार इतर सामान्यांचे असतात. मग सुरु होतो गर्दीचा खेळ. 
अशा वेळी आपल्याला राग येतो गर्दीचा.

कारणं शंभरावर असतात, भुशी डॅमवर किंवा धबधब्या खाली अंघोळ करावी म्हणुन धावपळ करून जावं आणि एंट्रीसाठीच स्वतःच्याच घामात अंघोळ करावी लागणं असो. नाहीतर आपण कास पठारावर निसर्गाचा आस्वाद घ्यायला निघावं. सुंदर पठार बघायला न मिळता गर्दीतल्या प्रेक्षणीय स्थळांतच 'नेत्र'सुख घेऊन परतावं लागणं असो.

देवाचं दर्शन घ्यायला 'चलो बुलावा आया' म्हणत आपण निघावं. कित्येक तास गर्दीत घरच्या लक्ष्मीची नजर चुकवून अन्य 'देवी'दर्शनाचा लाभ मिळावा आणि त्या गडबडीत खिशातली लक्ष्मी गहाळ/चोरी होणं. देवळातल्या रांगेत एक-एक दोन-दोन दिवस उभं राहावं लागणं. त्या उपर गाभाऱ्यातही निवांतात दर्शन न मिळता ब्राह्मण, पोलीस किंवा सेवक मानगुटीला धरून बाहेर काढतो. आपल्या आतल्या गाभाऱ्यातला देव जागरूक व्हावा ही अपेक्षा असते पण होतं भलतंच, धक्का देणाऱ्यातल्या देवाचा विचार न करता आपण शिव्या देत बाहेर पडतो. सगळा प्रवास, खर्च केलेला वेळ-पैसा क्षणात पाण्यात. कुंभमेळ्यातल्या प्रसाद वाटपातली चेंगराचेंगरीबद्दल सांगायलाच हवं का? पुण्य कमवायला जायचं आणि एखाद्याच्या नरडीवर पाय देऊन त्याला प्रसाद (प्रत्यक्ष साक्षात र्शन ते ही यमाचं?). तिकडं सैतानाला कंकर मारण्यासाठी जायचं आणि चेंगराचेंगरीत 'माणसं' मारून यायचं, सारं
अजबच. 
ते होऊ नये म्हणुन आम्ही सणासुदीला शक्यतो देवाला सुट्टी देतो. त्याला प्रत्यक्ष भेटायला न जाता त्याच्यासोबतच्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपची त्यालाच आठवण करवून देतो. मग तोही आम्हाला बुलावा वगैरे पाठवायच्या भानगडीत पडत नाही. तरीही भेटावं वाटलंच तर जळी-स्थळी असलेला तो, जिथे तितका 'जागृत' नसतो (हा एक मोठा जोक आहे त्यावर नंतर सविस्तर) तिथं आम्ही त्याच्या भेटीला जातो.
बरं, हे फक्त सुट्ट्यांपुरतं मर्यादीत असतं तर त्यांचं आपल्याला फारसं वाईट वाटलं नसतं. आपल्याला जायचं त्याच लोकलने-बसने इतरांना पण जायचं असतं, तेही त्याच वेळी. सगळ्यांच्या पोटापाण्यासाठी बाहेर पडण्याच्या वेळा सारख्याच. या वेळी शिव्या गर्दीपासून सुरु होतात व्हाया  रेल्वे ते केंद्र सरकार पर्यंत किंवा पार ट्रम्पपर्यंत. सर्दी झाली म्हणून दवाखान्यात जावं तर गर्दीमुळे आपला नंबर येईपर्यंत सर्दी सोबत डोकेदुखीं किंवा ताप येणं, कॉमन.
गर्दीचा काही लोकांना राग येत नसावा. जसे भुरटे चोर, व्यापारी, डॉक्टर, इ. दुसरे मोठे चोर राजकारणी,  ते तर भाडं वगैरे देऊन, नट नट्या बोलावुन पण गर्दी गोळा करतात. त्यां दोघांचं खरं प्रेम असेल गर्दीवर, पोटापाण्याचा प्रश्न आहे ना.
(भाऊंच्या उद्यानात उदघाटनावेळी गर्दी असेल म्हणुन गेलो नाही. काल बायको मुलासोबत गेलो आणि गर्दी बघुन आलेल्या ह्या विचारांच्या गर्दीला कोंडावं म्हणुन हा उपद्व्याप.)

इंफिनिटी


स्टोक्यास्टिक हा तसा मला आवडायला लागलेला विषय. 

मी शिकवतो म्हणुन नाही पण त्यातल्या काही भन्नाट कन्सेप्टसमुळे. पूर्वी काय व्हायचं माझं असं स्वतःचं काही वेगळं मत/विचार वगैरे काही नसायचं. मला आजकालमध्ये भेटलेल्या व्यक्तीसोबत झालेल्या चर्चेनुसारच त्याच्या मतासारखंच माझं मत असायचं, म्हणजे त्या मार्टींगल प्रोसेस सारखं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर, कुणी सांगितलं की धोनीपेक्षा विराट चांगला प्लेअर आहे, तर लगेच माझं मत/विचार 'विराट'. थोडी अक्कल आली की काय नक्की माहीत नाही पण आता असं होत नाही. ऍक्सिडेंट प्रोननेस् मॉडेल सारखं माझं मत दिवसागणिक कालच्या माझ्या मतात वेटेड ऍवरेजने इम्प्रोव्हमेंट करत राहत. 'किती लोकांचं मत आहे की विराट चांगला आहे आणि का?' असले प्रश्न स्वतःलाच विचारून मग स्वतःच मत मी बनवतो. जसजशी सॅम्पल साईझ वाढत जाते, माझं मत इम्प्रुव होत जातं. 
बऱ्याचदा आयुष्याची गणितं जुळायला लागलीत असं वाटायला लागतं अन् एखादं संकट पुन्हा गणिताची नव्यानं मांडणी करायला भाग पाडतं. एक्सपोनेंशील, मेमरी लेस प्रॉपर्टीमुळे, भुतकाळ विसरण्याचा सल्ला वारंवार देत राहतं. विस्मरणाचं वरदान त्याला असतं, आपल्याला नाही. तरी आपण रिन्युअलची वाट पाहत राहतो. कधी रिन्युअलस् मोजत राहतो, कधी उर फुटे पर्यंत धावतो अन् वर्तुळ पूर्ण करून पुन्हा मुळ जागीच उभे राहतो, पुन्हा अनंताच्या प्रवासासाठी रिजनरेटीव प्रोसेससारखं. 
मार्को प्रॉपर्टी काहीही म्हणो की 'तुमचं भविष्य तुमच्या वर्तमानावर अवलंबुन आहे, भुतकाळावर नाही'. तरीसुद्धा 'सुरवात कुठून कशी केलीस, त्याच्याशी मला घेणं देणं नाही, तुझा शेवट माझ्यासाठी महत्वाचा' असं म्हणत लिमीटिंग/स्टेशनरी नावाचं तत्व यमराजासारखं उभं राहतं. कधी ट्रांझिएंटसारखं 'अनंतात विलीन होऊन मुक्ती' नाहीतर रीकरंट सारखं 'पुनःपुन्हा ८४ लाख'. 

सहनशक्ती


हा देवपण ना.
मारकं बैल, भुंकणारं कुत्रं, विष्टेत तोंड घालणारं डुक्कर आदी बनवायची सामग्री घेऊन छानसं श्वापद बनवायला बसतो. छान माती घेतो, त्यात गरजे इतकं पाणी मिसळतो. थोडी अक्कल (गरज असल्यास, शक्यतो नाहीच), स्वभाव (भुंकणं, नको तिथे शिंग किंवा तोंड घालणं आदी) बाकी इतर तत्सम सवयी, रंग मातीत मिसळतो. मिश्रण चांगलं एकजिनसी होऊ देतो. छापे काढायचा विचारच करतो, अचानक काहीतरी होतं आणि तो उठुन निघून जातो (बायकोच्या फोनमुळे असेल कदाचित) परततो तो संतापातच. स्वतःच्या नशिबाला शिव्या देत विचाराच्या चक्रात काहीतरी बनवुन मोकळा होतो आणि देतो आमच्या सारख्याकडे पाठवुन. 
मग आमच्या भाळी लिहीली जातात, ही फक्त दोन पायाची पिसाळलेली श्वापदं. भोग नाही तर काय? बरं, आमच्या मिश्रणात सहनशक्ती तरी वाढवुन द्यावी ना, तर नाही. असो.

क्ष

ही गणित न कळणारी मंडळी खरं तर नास्तिक वगैरे असतात असं माझं स्पष्ट मत आहे. परवा कुणीतरी मला म्हणाला 'ही गणिताची माणसं, एवढे गणितज्ञ, शास्त्रज्ञ होऊन गेलेत म्हणे ह्यांच्याकडे पण फार पूर्वीपासून यांना त्यांचा 'क्ष'च सापडत नाही म्हणे'.


मला हसु आलं. कृष्णाला आपल्या विराट रूपातून अर्जुन दिसला असेल, तसा काहीसा क्षणभर मला तो भासला. पण कृष्णाचं ठीक होतं, तो अर्जुनाला दिव्यदृष्टी देऊन हवं ते एक्स्प्लेंन करू शकत होता. मी पामर ह्या प्राण्याला काय सांगणार,

'हे पार्था, आमचा 'क्ष' आमच्या जवळच असतो, कधी तो आमच्यासाठी अख्या मैदानाचं क्षेत्रफळ, कधी पृथ्वी सूर्यातलं अंतर, कधी इवल्यादेहाचं वजन, कधी वेग, कधी टाकिभर पाणी इत्यादी होतो. काय हवं नको ते सारं मिळवुन देतो आणि पुन्हा पूर्वीसारखाच अज्ञात...'

श्रद्धा हवी, तोही असाच आपल्याच मनात, मंदिरातल्या दगळात, आकाशात, अणू रेणुत, जळी स्थळी, बऱ्याचदा तर माणसातही सापडतोच की. सगुण साकार तरीही निर्गुण निराकार...

त्या आयुष्याच्या समीकरणात गुणकारा एवजी भागाकारात धन्यता मानणाऱ्या पार्थाला काय माझं डोंबल कळणारे...

मी ही हसलो त्याच्यातल्या 'क्ष' पार्थाला...

हर कोई यंहा सातवें आसमानपर

का आहे मी इथं? काय आहे माझं इथं?
बरं हे बऱ्यापैकी उंचावर आहे. सात एक टेकड्या आहेत इथं.
फार मोठी मोठी माणसं असतात इथं. त्यांच्या पदांची नावंपण भली मोठी मोठी असतात. पार फेफरे भरेल ऐकणाऱ्याला इतपत. इच्छित पदापर्यंत पोहचण्यासाठी खुप पापड लाटुन येतात हे लोकं. मेहनत तर इतकी की विचारायचीच सोय नाही. एका मागोमाग एक पद प्राप्त करत पदावर पोहचतात. नाही म्हणायला काही डायरेक्ट पण टपकतात, बापजाद्याच्या किंवा पुर्व पुण्याईने. ह्या उपटसुंभ लोकांचा एक प्रॉब्लेम असतो डायरेक्ट येतात, खालुन वर न आल्याने खालच्यांची दुःख, प्रॉब्लेम्स यांच्या गावीपण नसतात. बरं यांना कॉमनसेन्स वगैरे असतो की नाही माहीत नाही. असला तरी पदाची हवा डोक्यात जात असेल बहुतेक. ग्रासरूटचे प्रॉब्लेम्स म्हणजे ह्यांना त्यांच्या अस्तित्वाला सिद्ध करून दाखवायची संधी वाटते.



बरं इथच अशी लोकं असतात असं नाही, डोळे उघळले की आपल्या आसपास दिसतात ज्याला त्याला लाथ मारत फिरणारी गाढवं. १२वी पास/नापास शिक्षण सम्राट स्वतःच्या हुशारीने प्राध्यापक झालेल्याला अक्कल शिकविताना दिसतातच की. परवा परवा माझा एक जिवाभावाचा मित्र मला म्हणाला, 'अरे साध्या साध्या डेफिनिशनस् कळत नाहीत पोरांना.' पद दुसरं काय?  एरवी हे ऐकायला वाईट वाटलं नसतं पण स्वतः दर सेमिस्टरला नजरेचा टीका लावावा तसा बॅकलॉगचा टीका लावणाऱ्याकडुन. अ हं.

दहा वीस वर्षे जवळ जवळ काम करतात, करवुन घेतात. हलक्या फुलक्या वादळात खालच्याच्या पाठीशी उभी न राहणारी ही तर कातळीबचाव बुजगावणीच. असली उंदरं (कितीही मोठी असोत) जितक्या लवकर तुमचं गलबत रिकामं करतील, तितकी चांगलीच. कमीत कमी पुढच्या लढाईला प्राप्त मनुष्यबळाचा अंदाज तरी असेल. खोटा विश्वास तरी असणार नाही. स्वतःच्या (अल्प) ज्ञानाची, (आयत्या) पदाची टेंभी मिरवणाऱ्या ह्या सो कॉल्ड महाभागांना बुळाखालच्या अंधाराबद्दल कोण सांगणार ना.

सख्खी आई मेली तरी इथं मुल जगून जातं, हे कुठल्या भ्रमात जगतात कुणास ठाऊक. सांगा राव कुणी यांना, जग त्यांच्या अगोदरही चालू होतं आणि नंतरही चालु राहील, अव्याहत.
वपु म्हणतात, as you go personal personal, it becomes universal universal. तुमच्याकडेपण असतील अशी लोकं, हे सांगायला मला कुण्या ज्योतिर्भास्कराची गरज नाही. खालचा पदाचा मान ठेवतो, व्यक्तीचा नाही म्हणुन कदाचित मी अजुन इथय. मीही तसाच न होवो as n goes to infinity इतुकेचं.

वांझोट्या गप्पा


मी गावी ‘लाडली’ला असताना आम्ही लहान मोठी मुलं गावातल्या पानामाय जवळ जमत असायचो.

न्यूज चॅनेल्सवर चर्चांचे फड रंगतात तसेच आमचेही फड रंगायचे. कुणाच्या घरात टीव्ही नव्हते म्हणुन मनोरंजनासाठी असंही नाही, पण एकटं दूरदर्शन काय काय दाखवणार ना! आज कोणता विषय निघेल याला काही नेम नसायचा. विषयाला कुणीही हात घालावा, त्याला लगेच समर्थनार्थ आणि विरोधासाठी दोन गट तयारच. गट तयार होत असताना प्रत्येकाला विषय कळणं कम्पल्सरी वगैरे नाही बरं का! उगाच आपला ‘क्ष’ म्हणतोय ना मग मी विरोध करणार किंवा समर्थन करणार. काहींना त्या विषयाचा म्हणजे अगदी गाढा वगैरे अभ्यास, तसा त्यांचा अविर्भाव तरी. म्हणजे ‘पवारसाहेब, बाळासाहेब’ असोत, नाही तर ‘क्रिकेटची संघ निवड’ जशी रात्री एकाच बाटलीत पेले रिते करताना सर्व यांच्याच सल्ला मसलतीनेच. हिटलर, मुसोलिनी, अगदी लादेन सुध्दा यांच्याच सल्ल्याने हल्ले वगैरे करायची. ते स्वतः पाकीस्तानात जाऊन एकेका अतिरेक्याला ठेचून ठार वगैरे मारणार असतात, पण शेतात रात्री धुडगूस घालणाऱ्या डुकरांना घाबरवण्यासाठी सुतळी बॉम्ब लावायला जायचं असतं. टपरीवरची उधारी वर्षानुवर्षे थकवणारा त्या पंचावन्न कोटींचं रडगाणं रडायचा. उगाच प्रवक्ता वगैरेचे चोचले नाही त्यामुळे ‘पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील’ सारखे कातळी बचाव उत्तर नाहीत. चर्चेत सहभागी होण्याची तुझी लायकी नाही म्हणुन ‘तू चालता हो’ पासून ते एखाद्यावर हात उगारेपर्यंत. विद्यापीठात प्राध्यापक झालो, गाव सुटलं आणि हे असे चर्चांचे फड आता रंगणार नाहीत असं वाटायला लागलं. पण आता आम्ही प्राध्यापक मित्र जेवताना जमतो आणि... वांझोट्या गप्पा.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करतो. ‘भारत हा एक खूपसाऱ्या मूर्खांचा पण काही हुशार-सद्गृहस्थांच्या कृपेमुळे लोकशाही असलेला देश आहे’ असं माझं वैयक्तिक वगैरे मत. मी सुध्दा एक पक्की भारतीय कळपातील मेंढी (पुल्लिंगी!). माज-गर्व अजिबात नाही, पुल्लिंगी/भारतीय/मेंढी कसलाही.
(संदर्भ परिचारक, गुरमेहेरचा व्हिडिओ देशभक्ती-अभिव्यक्तीची कावीळ न झालेल्या डोळ्यांतून)


थोडासा स्पेस


थोडासा स्पेस

       अगदी काल परवाची गोष्ट आहे. कसल्याश्या विचारांनी डोक्यात थैमान घातलेलं होतं. अशावेळी मनाला एकांत हवा असतो. प्रत्येक वेळी कुणाला तरी काही सांगून, विचार थांबतात थोडीच. त्यांनाही कदाचित थोडी त्यांची स्वत:ची अशी स्पेस हवी असते. आपण दुसर्‍या कुणाजवळ व्यक्त होण्या अगोदर स्वत:जवळ व्यक्त व्हावं, विचाराचं अमृत मंथन वगैरे व्हावं, असं कदाचित त्यांनाही वाटत असावं. बऱ्याच वेळी असं काही वाटायला लागलं की, आपण स्केअर फिटस् मध्ये स्पेस मोजून लाखो खर्चून, घेतलेल्या घरात आपल्याला स्पेस मिळत नाही. मग आपण कुणा दुसऱ्याच्या मदतीने दाराला बाहेरून कडी किंवा कुलूप लावतो आणि बसतो आपण आपल्या ह्या उसन्या एकांतात. (मी असं बऱ्याच वेळेस केलंय) तसं नाही जमलं तर आपण घरातून बाहेर पडतो. एकांत शोधतो. पण नेहमी तेही जमेलच असं नाही. अशावेळी 'काय विचार करतोय?', 'काही टेन्शन आहे का?', 'आता मलापण नाही सांगणार का?' सारख्या आपल्याच माणसांच्या प्रश्नांनी आपण वैतागतो. शब्दांवरूनच तात्पुरता का होईना विश्वास उडलेला असल्यामुळे आपण उलटसुलट उत्तर देतो. प्रश्न विचारणारा जरी आस्थेने चौकशी करत असला तरी त्याला तसल्या उत्तराचा राग येतो आणि तो रागात निघून जातो. जाता जाता आपली लिंकतर तोडून जातोच पण नसलंच तर टेन्शन देऊन जातो.

       आपण लग्न करताना मुलीला तिची ध्येये विचारावी, तिची मोठी ध्येयं बघुन आपण तिला पसंत करावी आणि लग्नानंतर नवऱ्याचं सुख हेच तिनं तीचं मुख्य ध्येय करावं. 'मंगलाष्टक वन्स मोअर' मधल्या आरती(मुक्ता बर्वे)सारखी नवऱ्यालाच आपलं जग मानणारी, सारखी मागेमागे करणारी पत्नी कुणालाही नकोच असणारे. आपल्या जवळच्या माणसाला आपली काळजी वाटणं ठीक आहे पण आता माझं अंगणातल्या रोपावर प्रेम आहे. त्याची काळजी वाटते म्हणून 'त्याला थोडंही ऊन लागु नये' असा मी विचार केला तर? आता मी एक मुलाचा बाप म्हणून त्याची मला काळजी वाटणं साहजिकच आहे, पण गावातल्या रस्त्यांवर तो हरवू नये म्हणून नेहमी मी त्याला ने-आण करीत राहिलो तर? प्रत्येकवेळी शर्टाचा रंग निवडताना निळा अथवा पिवळाच कसा चांगला हे मी त्याला सांगू लागलो तर? प्रत्येक वेळी तो धडपडेल, तेव्हा त्याला मीच सावरायला लागलो तर? 'मी कसे जास्त पावसाळे पाहीलेत' आणि 'मीच कसा बरोबर आहे' असं ऐकवित राहिलो तर? दारातल्या रोपट्याची अवस्था होईल त्याची.

       अस का होतं? नात्यांनी माणूस मुक्त होण्याऐवजी जास्तच गुंतत जातो, गुरफटत जातो, कमळांच्या तलावात त्यांच्या देठांमध्ये गुरफटतो तसा. मोकळं व्हावं म्हंटल तर नाती तुटत जातात, जे कुणालाही नकोच असत. मग ती नाती रक्ताची असोत नाही तर भाव भावनांनी, स्नेहानी-प्रेमाने बनलेली का असेना. अचानक कुणी तरी गळा दाबावा, पाण्याखाली डोकं दाबून ठेवावं, अन श्वासाने अस काहीतरी करून अस्तित्वाची जाणीव करून द्यावी अस होत. आपलं ज्यावर मनापासून प्रेम असेल न त्याला आपण कसं मुक्त विहरू द्यावं. बंधनं अशी असावीत की त्यांना मानलं तरच त्यांनी त्याचं अस्तित्व दाखवावं, नाही तर आपलं अदृश्य असावं. मुक्त म्हणजे स्वैराचारी मुभा नव्हे, पण कसलंच दडपण पण नाही, अस काही तरी. गोठ्यातल्या गुरांना जसं दावणीला बांधून ठेवावं लागतं, तसं नसावं, किंवा ते पळून जाऊ नये म्हणून बांधतात ते लोंढणं सुद्धा नसावं. मांजरीचं पिल्लू कुठल्याही कानाकोपऱ्यात सोडलं तरी ते घरी परततच की.

       म्हणून प्रत्येकाला मिळायला पाहिजे थोडा तरी स्पेस.

हे भलते अवघड असते...

काल परवा एम.एस.सी.च्या विदयार्थ्यांचा निरोपाचा दिवस होता. प्रोजेक्ट आटोपून मुलं दुसऱ्या दिवशी होस्टेल-डीपार्टमेंट बाहेर पडत होती. काहींच्या पापण्या  पाणावलेल्या होत्या, अर्थात मुलींच्याच बाबतीत असं होतं असं नाही. आपल्याकडे मुलगा लहान असल्यापासूनच आपण त्यांच्यावर संस्कारच तसे करतो ना, ‘असा मुलीसारखा काय रडतोस?’ वगैरे. म्हणून मुलांची आपण कसे स्ट्रॉग वगैरे दाखवण्याचा प्रयत्न, नौटंकी चाललेली नुसती. आतून तसा प्रत्येक जण घाबरलेला असतो, कासावीस असतो. नेमक्या निरोपाच्या क्षणीच आठवणीं प्रचंड गर्दी करतात, प्रत्येक आठवण रूमाल टाकून सीट सांभाळायला बघते. आपलामात्र असाह्य कंडक्टर होतो, त्यांच्याकडे नुसतं पाहण्यावाचून आपल्या हाती काहीच नसतं. बरं एखाद्या आठवणीला 'बाई बारीक हो' म्हटलं तर तिला जास्तच चेव चढतो, ती आणखी पसरून बसते. सृष्टीची नियम पाळावे लागतात, ठरल्या वेळी गाडी काढावीच लागते. संदीप खरेंच्या भाषेत
‘कारे इतका लळा लावूनि नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते’
            या दोन-पाच वर्षांच्या प्रवासात आपण अनेक उतार चढाव एकत्र अनुभवलेले असतात. प्रवासाला सुरवात करताना ‘प्रवास कसा होईल?’ ही हुरहूर पहिल्याच पावसाच्या सरीं पळवून नेतात. हळूहळू मित्र-मैत्रिणी, ग्रुप, ‘खास’ तयार होत जातात, सुरवातीला नको असलेला सहप्रवासी सुध्दा नंतर हवा हवासा वाटायला लागतो. डीपार्टमेंटची, कॅण्टीनची, ढाब्याची, लॉंनची, कट्ट्याची, रायगडाची, होस्टेलच्या एन्डलेस मज्जाची सवय जळलेल्या मनाला होस्टेल सोडवत नाही. 'इथे कसे आपण तासनतास गप्पा मारायचो, एखाद्याची खेचायचो', 'याच रायगडावर तिला-त्याला पहिल्यांदा भेटलो-प्रपोझ केलं'. पुन्हा भेट होणार नाही झालीच तरी ‘अशी’ भेट होणार नाही, हि कल्पना अस्वस्थ करत असते. म्हणूनच हुंदका आवरून ‘गावी ये-घरी ये’, ‘भेटूया’, ‘टच मध्ये रहा’, ‘विसरू नकोस’ वचनें दिली घेतली जातात.            
            हा कॉलेजचा सुरक्षित किनारा सोडताना नवे प्रदेश, नवी क्षितिजे खुणावत असतात. किनारा सोडल्यानंतर सागरात आपल्या होळीचा निभाव लागेल की नाही? अशी अनामिक भीती गाभाऱ्यातल्या नाविकाला जाणवत असते. 'मनातल्या सितेच्या प्राप्तीसाठीचा ‘शिवधनुष्य’ पेलवेल की  नाही?' असल्या शंकाकुशंका. 'झटकन मिळेल ती नोकरी घेऊ. आई थकलीये, बाबा थकलाय. त्यांनी आपल्यासाठी खूप खस्ता खाल्यायेत. आता आपल्याला संधी आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करायची. त्यांना सुख काय आहे ते दाखवायची'. या सर्वांसाठी गरजेची आहे ती नोकरी/धंदा. मग नोकरीच्या शोधात पायपीट सुरू होते. काहींना 'अभ्यासाच्या जाचातून सुटलो एकदाचे!' असं वाटायला लागलेच असतं आणि इंटरव्ह्यूत निरूत्तर करणारे प्रत्येक प्रश्न, बंक केलेले लेक्चर आठवून देतात. आई-बाबा, नातेवाईक, मित्रांच्या अपेक्षांच्या नजरा त्रास द्यायला लागतात.
       म्हणून खरंच हे सारं अवघड असतं.
हे सगळं मान्य केलं तरी या वर छोटे छोटे उपाय करता येण्यासारखे असतात.
            योग्य वेळी हसता आणि रडता आलं पाहिजे. विरहाचं दु:ख ज्याचं त्यालाच वाहून न्यावं लागणारे. त्यामुळे 'एक्स्प्रेस' होणं महत्त्वाचं आहे. ते रडून-हसून-लिहून-गाणं म्हणून-‘फोटोज-व्हिडीओ’ बनवून का असेना, माध्यम कुठलंही असो 'एक्स्प्रेस' होणं, व्यक्त होणं महत्त्वाचं नाही का? हे सर्वच बाबतीत लागु होतं. आपण व्यक्त होणं विसरलो तर आपल्याला गृहीत धरणं सुरू होतं. 'आपल्याला गृहीत धरलं जाणं' ही भावना अस्तित्वावर आघात करते. मी मार्कांमध्ये-सुंदरतेत 'बिलो अॅवरेज' आहे किंवा ऑफिसमध्ये माझं इंग्रजी कच्चं आहे म्हणून मला गृहीत धरलं जातंय, हा न्यूनगंड फार भयानक. इथं प्रत्येकाला स्वतंत्र असं अस्तित्व असतंच ना. तो विधाता एवढ्या मोठ्या सृष्टीची रचना करताना चुकला नाही, मग तुमच्या-मा‍झ्या सारख्याच्या निर्मितीत तो कसा चुकेल? बगीच्यातली हिरवळ असो की मंदिराच्या कळसाला लागलेलं शेवाळ दोघांनाही अस्तित्व आहेच. हे मान्य की तो प्रत्येकाला एक तरी दुखरी नस देतो. प्रत्येकाची दु:खं वेगळी तशी सुख-बल स्थानं ही वेगळीच. एकट्याने रात्री ऊशी ओली केल्याने कुणाला काही मिळायचं नाही, व्यक्त होणं महत्त्वाचं.
            ‘टच मध्ये रहा’ व्यवसायाच्या-संसाराच्या अडचणी प्रत्येकालाच असणारेत, पण पत्र-मेल-वाढदिवस शुभेच्छा, वरचे वर भेटीगाठी व्हायला हव्यात. दोनाचे चार, चाराचे सहा होतांना भेटी शुभेच्छा होत राहाव्यात. नात्यातला ओलावा टिकून राहायला हवा. तरच आयुष्याच्या झाडावर हिरवळ टिकून राहील. हिरवळ नसलेली झाडं साउली देऊ शकत नाही. व्यवसायात-नोकरीत वर जाणं चागलंच. पण झाडांनी नुसतं उंची वाढवुन चालत नाही, त्यांचा घेराही मोठा असला पाहिजे, नाहीतर हलक्या फुलक्या वादळात ती उन्मळून पडतील. थोडक्यात काय, मित्रांचा गोतावळा हाकेच्या अंतरावर असणं महत्त्वाचं. अंतर गुगल मॅपवरचं नाही, मनातलं अपेक्षित आहे. पाठीवर अपेक्षांचं ओझं भरपूर असलं तरी उराशी बाळगलेली स्वप्नं आपल्याला लढायची उर्मी देत राहतील, गरज असेल ती प्रबळ इच्छा शक्तीची आणि योग्य आधाराची. एकत्रपणे लढायचं ठरवलं तर काहीही अवघड नसेल. 'तु फक्त हो म्हण, सही करायला आम्ही आहोतच' असं काहीतरी. परीक्षेचा अभ्यास एकत्रपणे करतो, तसाच आयुष्याच्या ह्या परीक्षेत सुख दुखांना सोबत करता आली पाहिजे. ‘इंटरव्ह्यूत तुला त्याचं उत्तर आलं नाही म्हणून काय दु:खी होतो, मलातर ह्याचं पण उत्तर देता आलं नाही’, असं म्हणून दु:ख विनोदात बदलवणारा एखादा सखा सोबत असावा. मला नोकरी मिळालीये तरी सोबत इंटरव्ह्यूला येतो, अगोदर जाऊन काय काय विचारतायेत ते तुला मी सांगतो, मग तु जा. एवढं जमलं पाहिजे. याच्या जागा आल्यायेत भाड्या फॉर्म भर, असं हक्काने सांगणारं कुणी तरी असावं.
वपु म्हणतात ‘एक माणूस दुसऱ्या माणसाच्या दु:खाच्या पातळी पर्यंत पोहचुच शकत नाही, तो फक्त कल्पनाच करू शकतो’. मला हे बोलायला सहज शक्य आहे कारण मी किनाऱ्यावर उभा आहे. पण कधीतरी ही पातळी आम्ही सुध्दा जवळून पाहिलीये. आज प्राध्यापक म्हणून काम करतांना दरवर्षीची पावसाळ्यातली हिरवळ मी अनुभवतोय तसंच मे नंतरचा कडक उन्हाळाही.
       असो. बहु काय लिहावे. आपण जाणकार आहातच.

काही बाही

काल परवाच नवीन घरात शिफ्ट झालो. घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून असं म्हणतात. माझे दोन्ही झालेत. सिकंदराला माझ्यापेक्षा थोडा कमी आनंद झाला असेल कदाचित. सलग दोन दिवसाच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने आम्ही गृहप्रवेशाचा मुहूर्त ठरवला, ब्राम्हणाला दक्षिणा न देता, भूतांना जेऊ न घालता. तर सामान आवारावर चाललेली. वरच्या माळावर काही बॉक्स सापडलेत. मदतीला आलेल्या घरमालकांनी 'यात काय आहे?' असं सहजच विचारलं. तेव्हा मी थोडं गर्वानेच सांगितलं, 'यात माझी संपत्ती आहे' म्हणून. काय होती ती संपत्ती? कोणे एकेकाळी मला वाचनाची काय ती आवड होती. खरच होती कि मित्रांपुढे थोड्या पाठ केलेल्या वाक्यांनी फुशारक्या मारता येतात म्हणून वाचत होतो कोण जाणे. पण थोडं फार अगोदर वाचत होतो. मधल्या काळात सगळं बंद झालं. वर्षाकाठी एखादं दुसरं पुस्तक वाचण होतं होतं, पण आज काल तेही बंद झालंय. कधी कधी हुक्की येते आणि मी तीन चार पुस्तकं विकत घेऊन येतो, वर्षाकाठी. वाचण होतंच असं नाही. बऱ्याचदा नाहीच. एक वपू काळे आणि दुसरे खांडेकर सोडलेत तर बाकीचे मी कधी त्यांना वाचतोय, त्याचीच प्रतीक्षा करीत राहतात बिचारे.
            मी माझ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला द्यायच्या उत्तरांबद्दल चर्चा करतांना नेहमी एक विषय ठरलेला असतो. छंद. विद्यार्थी एकदम फार्मात सांगतात माझा छंद वाचन म्हणून, पण शेवटी वाचलेलं पुस्तक विचारलं कि गांगरतात. मग एखादा सांगतो शामची आई. वाचलं कधी? इयत्ता पाचवी नाहीतर सहावी. मधल्या काळात छंद खुंटीवर. मटण खाणारे काही महाभाग  माळ/जानवं टांगतात तसं. असं काहीतरी आपलं झालंय असं मला आतून वाटायला लागलं. बायकोने पसारा होऊ नये म्हणून पर्याय सुचवला 'आपण हा रचलेला बॉक्स तसाच राहू देऊ म्हणजे नव्या घरात सरळ माळ्यावर ठेवता येईल'. मी मनात थोडा निश्चय केला आणि काही न बोलता होकार भरला. काल विद्यापीठातून घरी आलो आणि घरात टी-२० क्रिकेट विश्वचषकाचा भारत-बांग्लादेश सामना चालू होता. बापाला क्रिकेट बघण्याचं वेड. आपली डाळ शिजणार नाही म्हणून मी सहज वर गेलो हाताला लागेल ते पुस्तक घेतलं वाचयला. पुस्तक होतं दया पवारांचं 'बलुतं'.
            मी हे पुस्तक का विकत घेतलं असेल? माहित नाही. असली पुस्तकं मला कधीच आवडली नाहीत. कारण माहित नाही पण परवा परवा गाजलेला 'फंड्री', 'कोर्ट', 'पान सिंग तोमर' आणि 'चक्रव्यूह', 'आरक्षण' यांसारखे चित्रपट पण तशाच पठडीतले. 'अरे, तुम्हारी टट्टीयां साफ की हमने' म्हणणारा सैफ अली कित्तेकदा मला त्या लोकांचं दु:ख दाखवत राहिला. विषय कदाचित वेगवेगळे असतील पण बाहेर पडताना मधमाश्यांचा पोळ्याला दगड मारल्यानंतर मधमाश्या मागे लागाव्या तसे असंख्य प्रश्न डोकं भंडावून सोडतात. ७८ साली प्रसिध्द झालेलं हे आत्मचरित्र आज तसं काल्पनिक वाटायला हरकत नव्हती पण समाजात फार फरक पडलाय असं आहे का? नाही. आजही माझ्या 'गावाबाहेर' महारवाडा आहे. गावातल्या मंडळीना पंगतीला बोलवण्यासाठी नाव्हीच दारोदार भटकतो. वर्षाकाठी त्या मोबदल्यात त्याला काहीतरी दिलं जातं म्हणे. वरच्या पदावर बसलेला खालच्या(?) जातीचा इतरांना कसा नको असतो, तो सुध्दा तुमच्या बापजाद्यांनी आम्हाला
छ्ळल म्हणून तो यांना छळतो. सगळंच दुष्टचक्र. मला समाज म्हणजे फक्त महार/दलित/नवबौध्दांच्या अशा लिमिटेड एडिशनबद्दल बोलायचं नाहीच आहे. आज असहिष्णुतेवर गप्पा मारणारे राजकारणी पाहिलं कि वाटतं, इतकी युग हि षंढ झोपली होती का? एखादी खैरलांजी, दादरी जळायलाच हवी का यांच्या पोळ्या शेकण्यासाठी? एखादा रोहित जायलाच हवा का? यांना आईचा पान्हा फुटण्यासाठी. माझ्या स्वयंघोषित महान अशा महाराष्ट्रात, गेल्या वर्षभरात, मागील पंधरा वर्षात सर्वात जास्त आत्महत्या झाल्यात म्हणे. १०००च्या आसपास राहिलेत म्हणून save tigers लिहावं लागतंय, मोहीम वगैरे चालवाव्या लागता आहेत. त्या क्षणाची वाट पाहणार आहोत का आपण ?  तुम्ही, मी काहीच करू शकत नाही का? एखादं दुसऱ्या नाना मकरंदनेच का खटपटी करायच्या? शरीरावर एखाद्या ठिकाणी, समजा अंगठ्याला जखम झाली तर फक्त अंगठा ती वेदना सहन करतो का? नाही, ती वेदना पूर्ण शरीराची होते. ओठ फुंकर घालतात. हात मलमपट्टी करतात. समाज एक शरीर असेल तर मी कुठे आहे? माथ्याशी कि पायथ्याशी. यापेक्षा जखम कुठे आहे? मी काय करू शकतोय? ते जास्त महत्वाच नाही का?
            मान्य आहे आपण सर्व कलियुगात जन्मलेले अश्वथामा आहोत. प्रत्येकाच्या भाळी वाहती जखम आहे. माझी जखम किती मोठी आणि तुझी किती, माझ्या समाजाची किती तुझ्या समाजाची किती? हा खेळ खेळण्यापेक्षा काहीतरी वेगळ व्हायलाच नकोय का? एक दुसऱ्याला आधार न देता, सारासार विचार न करता किती दिवस आपण त्याचं रूढी परंपरांच क्रूस वाहत जाणार आहोत. कदाचित माझ्या या कथनातून मी वाण्या बामणाचा वाटेल. पण मी माझ्या बापाचे शेतीतले हाल पाहतोय. तरी आज न उद्या छान उत्त्पन्न येईल आणि मी कर्जातुन मोकळा होईल या आशेवर बाप दरवर्षी कर्जात भर टाकतोय. माझ्या गावातले कित्येक तरुण गाव सोडून, शेती सोडून कामधंद्यासाठी जळगाव-पुण्यामुंबईत पळालेत. काहींनी दुधाच्या काहींनी पान सुपारीच्या टपऱ्या सुरु केल्यात. आज निमित्त पावसाचं असेल, कदाचित उद्या पिकाच्या भावाचं, परवा गारपिटीच. हनुमानाची शेपूटच जणु. शेतात कामधंदा नाही म्हणून व्यसनाकडे शेतकरी वळला आणि नंतर आत्महत्या केली, तर शहाणे बोलायला तयार व्यसनामुळे/मोबाईलच्या बिलामुळे गेला म्हणून. जिभेला हाड नसतं म्हणे पण म्हणून बोलण्यासाठी येणारे शब्द. ते तर बुद्धी पुरवतेना. का तिला हि पुरवली माती आड यांनी? मला आठवतंय चांगलं माडगूळकरांची(?) का कुणाची तरी 'बनगरवाडी' वाचलेली एक दहा वर्षापूर्वी. तेव्हाही असंच काही बाही विचार मला छळांयचेत. मी सहज सुट्टी निमित्त नाशिकला मामाकडे गेलो होतो एक दोन दिवसा करता. मी माझ्या मामींना ते पुस्तक देऊन सांगितलं आता मला हे पुस्तक वाचायची इच्छा नाही तुमच्या कडे असू देत. त्या मामांचे पण पुढे हालच झालेत. कोड असलेली बायको जबरदस्ती करून दिली म्हणून लग्नाच्या पंधरा वर्षानंतर हा अतीव दु:खात बुडाला आणि याने बाटलीला जवळ केलं आणि संसाराची राख रांगोळी केली. दु:खाची  वाटणी करतांना तो शिकलेला, अडाणी, गरीब, श्रीमंत, शेतकरी, नोकरदार असा भेदभाव थोडीच करतो. असो.
            विषय भरकटलाय कदाचित. मोठ्या मोठ्या गप्पा मारून उद्या मी सर्व विसरून जाणार. स्वत: मोठं पुण्य करतोय, समाजासाठी काही तरी करतोय या समाधानासाठी हजार दोन हजारची मदत 'नाम'ला पाठवेल आणि पुन्हा काही झालच नाही अशा अविर्भावात वावरेल, निगरगट्ट सारखा... नाहीतर 'शिवाजी कोण होता?' आणि 'शुद्र खरे कोण होते?' शोधेल, आणखी थोडं डोकं फिरवून घ्यायला.           मनोज